लियोनेल मेस्सीचा षटकार, सहाव्यांदा जिंकला ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सीने ‘फिफा’चा यंदाचा (2019) सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला. 32 वर्षीय मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डो व वर्जिल वॅन डाइक यांना मागे टाकून कारकीर्दीत सहाव्यांदा या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. रोनाल्डोने पाच वेळा हा पुरस्कार पटकावलेला आहे.

मिलानमध्ये एका दिमाखदार कार्यक्रमात ‘फिफा’ने ही घोषणा केली. बार्सिलोनाचा आघाडीचा खेळाडू असलेल्या लियोनेल मेस्सीने आपल्या क्लबला मागील सत्रात ला लिगाचे चॅम्पियन बनविण्यात आणि चॅम्पियन लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मेस्सीने याआधी 2009, 2010, 2011, 2012 व 2015 मध्येही ‘सर्वोत्तम फुटबॉलपटू’चा पुरस्कार पटकावला होता. यावेळी मेस्सीने सर्वाधिक 46 गुणांची कमाई करीत ‘सर्वोत्तम फुटबॉलपटू’ किताबाचा षटकार ठोकला. या शर्यतीत लिव्हरपूरचा वर्जिल वॅन डाइक 38 गुणांसह दुसऱया, तर जुवेंटसचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 36 गुणांसह तिसऱया स्थानी राहिला. मेस्सीला प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस्तियानो 2008, 2013, 2014, 2016 व 2017 मध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार आपल्या नावे केलेला आहे.

मेगन रापिनो सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू
अमेरिकेची फॉरवर्ड खेळाडू मेगन रापिनो हिला ‘फिफा’चा यंदाचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा किताब मिळाला. जुलैमध्ये झालेल्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेला जगज्जेते बनविण्यात रापिनो हिचे बहुमोल योगदान होते. तिने या स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करून गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल हे दोन्ही पुरस्कार मिळवले होते. याचबरोबर लिव्हरपूल क्लबचे प्रशिक्षक जुर्गन क्लॉप हे पुरुषांमधून ‘फिफा’चे सर्वोत्तम प्रशिक्षक ठरले, तर महिला गटात हा मान अमेरिका संघाची प्रशिक्षिका जिल एलिस हिला मिळाला.