मेस्सीला अर्जेंटिनासाठी खेळता येणार, कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यान ठोठावण्यात आलेली बंदीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांमध्ये बार्सिलोना क्लबसोबतच्या करारामुळे चर्चेत राहणारा लियोनेल मेस्सी पुढल्या महिन्यात होणाऱया वर्ल्ड कप पात्रता फेरीतील इक्वेडोरविरुद्धच्या सलामीच्या लढतीत अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करू शकणार आहे. कोपा अमेरिका या गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेदरम्यान दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघटनेच्या प्रमुखावर भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केल्याप्रकरणी लियोनेल मेस्सीवर एका लढतीच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता हा बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून तो आता देशासाठी खेळू शकतो, अशी माहिती अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडीओ तापिया यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली आहे.

कोपा अमेरिका या स्पर्धेतील चिलीविरुद्धच्या लढतीत गॅरी मेडेल याच्यासोबतच्या झुंजीनंतर लियोनेल मेस्सीला रेड कार्ड दाखवण्यात आले होते. यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आयोजक देश असलेल्या ब्राझीलच्या बाजूने निश्चित करण्यात आलेली आहे, असा आरोपही लियोनेल मेस्सी याने केला होता. ब्राझीलकडून उपांत्य फेरीत अर्जेंटिना पराभूत झाल्यानंतर लियोनेल मेस्सी कमालीचा नाराज झाला होता. त्यामुळे त्याने असे वक्तव्य केले होते. बंदीच्या शिक्षेमुळे इक्वेडोरविरुद्धच्या लढतीला लियोनेल मेस्सी मुकणार असे वाटत होते. पण दक्षिण अमेरिका फुटबॉल कॉन्फेडेरेशनचे अध्यक्ष ऍलेक्झॅण्ड्रो डोमिंग्वेझ यांनी लियोनेल मेस्सीला खेळण्याची परवानगी दिलेली आहे, असे क्लॉडियो तापिया यांनी म्हटले.

पण तो खेळणार का…
लियोनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केलेले नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडीनंतर तो आंतरराष्ट्रीय लढतीत खेळण्यासाठी तयार झाला असेल का, त्याची पुनरागमन करण्याची इच्छा आहे का, पुन्हा त्या जोशात तो कमबॅक करील का, हे प्रश्न यावेळी उभे ठाकले आहेत. बघूया लियोनेल मेस्सी कोणता निर्णय घेतोय ते.