नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाने तीन दिवसात नऊ लाखांची दारु पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी आणि विशेष पथकाद्वारे नांदेड जिल्ह्यात अवैध, देशी, हातभट्टी, सिंदी, ताडी, विदेशी व पराराज्यातील मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून धडक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसात या पथकांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत 14 जणांना अटक करुन त्यांच्याकडून देशी, हातभट्टी, रसायनसह दुचाकी असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. मात्र, संचारबंदीचे आदेश धुडकावत काही अवैध दारु विक्री करणारे धंदा करत आहेत. अशा धंद्यावाल्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी भरारी पथकासह अन्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले. बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार या तीन दिवस केलेल्या कारवाईमध्ये पथकाने नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करून 14 जणांना अटक केली. विशेष मोहिमेअंतर्गत चिकाळा तांडा (ता. मुदखेड) परिसरात केलेल्या कारवाईत 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी पथकाला दोन आरोपी सापडले. मात्र, इतरजण मद्याचा मुद्देमाल सोडून पसार झाले. या कारवाईत 12 हजार 800 लिटर रसायन व हातभट्टी दारु असा तीन लाख 24 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत तीन लाख 36 हजार 332 तर तिसऱ्या कारवाईत दोन लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक एस. एस. खंडेराय, भरारी पथकाचे निरीक्षक पी. ए. मुळे, निरीक्षक एस. एम. बोदमवाड, निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, टी. बी. शेख, पी. जी. कदम, पी. बी. टकले, वाय. एस. लोळे आदींनी ही कारवाई केली.