स्वबळावरच लढायचं, स्वबळावरच जिंकायचं; आदित्य ठाकरेंची गर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जनतेची सेवा करायची असेल तर आपल्याला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता आणावी लागेल. त्यासाठी आता स्वबळावरच लढायचं, स्वबळावरच जिंकायचं, अशी गर्जना शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत केली. आदित्य ठाकरे यांच्या या गर्जनेनंतर शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी सारं संकुल दणाणून सोडलं.

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज अत्यंत दिमाखात साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आले असून यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं.

निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे आजपासूनच कामाला लागायचं आहे. आपण जी कामं केली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत, शिवसेना महाराष्ट्रातच नाही तर देशभरात न्यायची आहे, अशी जबरदस्त घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सिनेट निवडणुकीत दाखवून दिलं की शिवसेना जिद्दीने आणि चिकाटीने कामाला लागली तर काय होऊ शकतं हे सिनेट निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. ही कठीण, किचकट निवडणूक होतीतरी देखील आपण ती निवडणूक जिंकलो.

पालघरमध्ये नैतिक विजय शिवसेनेचाच

एकहाती सत्ता आणायची असेल तर लोकसभा आणि विधानसभेत, दोन्ही सभागृहांमध्ये आपलं बहुमत असायला हवं. पालघरमध्ये कुणी कागदावर जिंकले असतील पण नैतिक विजय हा आपलाच झाला आहे, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडली.