Live update – ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात; उद्धव ठाकरे यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा थोड्याच प्रसिद्ध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन दिले. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट झाले आहे.

  • मी मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीचे दालन गिरगाव चौपाटीला होणार होते. ते बिल्डरांच्या घशात घातले. वरळी दूध डेअरचे तिथेच पुनर्वसन करून जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करणार होतो. ते रद्द करून ते बिल्डरच्या घशात घालत आहेत. देवनार डंपिंग ग्राऊंड बिल्डरच्या घशात घालत आहेत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातली आहे. मुलुंड, कांजुरची मिठागारं अदानीच्या घशात घातली आहेत. म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचे अदानीस्थान होईल हे माझे स्पष्ट आणि ठाम मत आहे – उद्धव ठाकरे
  • भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? आम्ही मराठी आहोत, हिंदूच आहोत. संयुक्त महाराष्ट्रापासून मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ कधी होता? हा कधी मराठी माणूस, हिंदूंच्या मागे उभा राहिला? – उद्धव ठाकरे
  • पेशव्यांच्या काळात तीन संस्थान उभी राहिली. गायकवाड, शिंदे आणि होळकर. बडोद्यामध्ये मराठेशाहीचे साम्राज्य उभे राहिले. मग त्या गुजरातमध्ये सगळे महापौर गुजराती का होतात? हा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार, इथे कसले हिंदू, मराठी करताय तुम्ही? आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार – राज ठाकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. ठेवी या चाटायला नसतात, हे 100 टक्के खरे आहे. ठेवी या चाटायला नसतात, पण त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावायचे ठरवले आहे – उद्धव ठाकरे
  • आम्ही मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी 92 हजार कोटींपर्यंत नेऊन दाखवल्या होत्या. त्यापैकी 40-45 हजार कोटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटीसाठी असतात. उरलेले लाँग टर्म आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी असतात. त्याच पैशातून मुंबईसाठी टोलमुक्त कोस्टल रोड करून दाखवला. हे गल्लीबोळात रोड केले तरी टोल लावतात. गडकरींचा मुंबई-गोवा रस्ता होतोय. 200 वर्षात तो होणार की नाही माहिती नाही – उद्धव ठाकरे
  • हे महाराष्ट्राचे यूपी, बिहार करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे, त्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात सुरू. महाराष्ट्र वेगळा, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे अशा प्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्रातील येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे येऊ इच्छितात राजकारणात त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे – राज ठाकरे
  • त्यांना असे वाटत असेल की आम्ही सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल तेव्हा आपण काय करणार आहात याचा विचार सत्ताधाऱ्यांनी त्या-त्या वेळी करणे गजरेचे असते. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना याचे भान राज्यकर्त्यांकडून सुटले, तर पुढे काय होते हे आज आपण पाहतोय. राज्यातील लोकांनी याचा विचार करणे आवश्यक आहे – राज ठाकरे
  • सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आला तेव्हा काँग्रेसने हे केले ते केला सांगता, पण उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहे, त्याच्या दामदुप्पटीने पुढे सुरू होईल तेव्हा कुणाकडे तक्रार करू नका – राज ठाकरे
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या. त्या विरोधात भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आता त्यांचे महाराष्ट्रातील गोष्टींबद्दल काय म्हणणे आहे. पश्चिम बंगालमध्ये चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करता – राज ठाकरे
  • निवडणुकांमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथल्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. जे मतदार ज्यांना आपण जेन झी म्हणतो, जे पहिल्यांदा मतदान करणार होते. त्यांच्या मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारला आहे. तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून तिथे पुनर्निवडणूक घेतली पाहिजे. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात, हा समाज तुमच्याबद्दल होईल. – उद्धव ठाकरे
  • मंत्र्यांनाही त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ‘ऑन द स्पॉट’ संरक्षण काढून घ्या म्हणतात. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना सभागृहात असतो, बाहेर नाही – उद्धव ठाकरे
  • अध्यक्ष विधिमंडळाचे असतात आणि कारभार नि:पक्षपातीपणे करण्याची जबाबदारी त्यांची असते. अध्यक्ष कोणत्या पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाही किंवा जाता कामा नये असा अलिखित दंडक आहे. त्याला छेद देणारे उद्दाम वर्तन त्यांनी केले आहे. म्हणून त्यांना निलंबित केले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे – उद्धव ठाकरे
  • राहुल नार्वेकर दमदाटी करताहेत, ‘ऑन द स्पॉट’ संरक्षण काढण्याचे आदेश देत आहेत. निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घेऊन विधानसभा अध्यक्षांना निलंबित केले पाहिजे – उद्धव ठाकरे
  • कल्याण-डोंबिवली, ठाण्यात बिनविरोध निवडणूक करण्याची प्रक्रिया राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे – उद्धव ठाकरे
  • मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम-दाम-दंड-भेद. एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला लाभले नव्हते – उद्धव ठाकरे
  • आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली असे वातावरण आहे – उद्धव ठाकरे
  • नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा बघतोय – राज ठाकरे
  • शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसतंय. राज ठाकरे याचे शिवसेना भवनात 20 वर्षानंतर आगमन झाले आहे – संजय राऊत
  • उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनातील तुळजाभवानीसमोर नतमस्तक होत तिच्या चरणी वचननामा ठेवला
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल
  • मनसेप्रमुख राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले स्वागत