सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठामध्ये एल. एल. एम. अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मराठीतून उपलब्ध करून द्यावी या शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने दिलेल्या लढय़ाला यश मिळाले आहे. एल. एल. एम. प्रवेश परीक्षा आणि एल. एल. एम. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठीतून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर विधीच्या एल. एल. एम. या दोनवर्षीय अभ्यासक्रमाला प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे. या विषयीचा पाठपुरावा सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, डॉ. सुप्रिया कारंडे, मिलिंद साटम, ऍड. वैभव थोरात, शीतल शेठ-देवरुखकर, निखिल जाधव, डॉ. धनराज कोहचाडे यांनी केला.























































