
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून शहरासह ग्रामीण भाग बराच काळ अंधारात राहत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकवर्ग आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान कवठी, चेंदवण भागातील वीज प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कवठी ग्रा.पं.चे शिवसेनेचे सरपंच रूपेश वाडयेकर यांनी दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वीजेचा प्रश्न शहरासह ग्रामीण भागाला भेडसावतो. याहीवर्षी पावसाळ्यात वीज वितरणचे तीन तेरा वाजले असल्याने तालुक्यातील बरीच गावे सात – आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ म्हणजेच दोन दोन दिवस अंधारात राहत आहेत. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी वीज पोल व वाहिन्या तुटल्या आहेत. यात महावितरणचे नुकसान झाले आहे. मात्र वारंवार पावसात विज पुरवठा खंडीत होत आहे. माणगांव खोऱ्यासह नारूर, कुसगाव, हिर्लोक, किनळोस, डिगस, पावशी, तेर्सेबांबर्डे, वाडीवरवडे, पिंगुळी, नेरूर, कवठी, चेंदवणसह बऱ्याच ग्रामीण भागात वारंवार विजेचा खेळखंडोबा असून रात्री अपरात्री वीज गायब होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना गैरसोय होत आहे.
तालुक्यात सर्वत्रच वीजेची समस्या निर्माण होत असून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दर महिन्याला वीज बिल भरणा करूनही चांगल्याप्रकारे सेवा मिळत नसल्याने वीज ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान चेंदवण, कवठी परिसरातील वीज प्रश्न तातडीने मार्गी लागून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कवठीचे सरपंच रूपेश वाडयेकर यांनी दिला आहे.

































































