
लोकलमधून पडलेल्या मुलीला मदतीचा हात देत तिचा जीव वाचवणाऱ्या दिनेश धुमल या तरुणाचा शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धुमल याच्या धाडसाचे त्यांनी विशेष कौतुक केले. यापुढेही असेच धाडस दाखवण्याचा निर्धार त्याने केला आहे.
फ्लेक्सिलॉन्स ऑपरेशन्स टीममधील दिनेश धुमल हे 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता आपल्या कार्यालयातून घरी विठ्ठलवाडीला जाण्यासाठी निघाले होते. स्टेशनवर येण्यापूर्वीच लोकल बराच वेळ थांबली. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी दिनेश लोकलमधून खाली उतरला. त्यावेळी गर्दीच्या रेट्यांमुळे एक मुलगी खाली पडल्याचे त्याला दिसून आले. दिनेश याने तातडीने अन्य एका व्यक्तीच्या मदतीने त्या जखमी मुलीला पुन्हा लेडीज डब्यात ठेवले.
स्टेशनवर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. अखेर जखमी अवस्थेत त्या मुलीला रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात वेळेवर डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे मुलीचे प्राण वाचले. या घटनेची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दखल घेत दिनेश धुमल याचा विशेष गौरव केला























































