मध्य रेल्वेवर 10 दिवसांत 768 लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा

मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवेचा दररोज बोजवारा उडत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सरासरी 60 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या जात असल्याने नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत मध्य रेल्वेने विविध कारणांमुळे 1 ते 10 सप्टेंबरदरम्यान, 768 लोकल फेऱ्या रद्द करुन प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली आहे.

गेल्या आठवड्यात गणेशोत्सवाची धामधूम होती. त्या काळात प्रवाशांची विशेष व्यवस्था करण्याऐवजी मध्य रेल्वेने गणेशभक्तांचेही हाल केल्याचे यातून उघड झाले आहे. यावर प्रवासी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मध्य रेल्वे लोकांना वेठीस धरत आहे. प्रशासनाने वेळीच कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी दिला आहे. प्रवाशांना बुलेट ट्रेन नको, मूलभूत सुविधा सुधारा, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघाचे राजेश पंड्या यांनी दिली.

रविवारी तब्बल 200 फेऱ्या रद्द

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दक्षिण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक होते. त्यांच्या सोईसाठी अधिक व्यवस्था करण्याऐवजी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या गैरसोईत भर टाकली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 72 आणि रविवारी तब्बल 200 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याचा प्रचंड त्रास वीकेण्डला घराबाहेर पडलेले प्रवासी आणि गणेशभक्तांना झाला.