लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावणारा गजाआड

लोकलच्या प्रथम श्रेणी वर्गातून प्रवास करणाऱया महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱया चोराला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत.

मधुरा गुरव या महिला प्रवाशी दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्र. 5वर दादर-विरार लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्ब्यात चढल्या. त्या वेळी एक व्यक्ती त्याच डब्ब्यात आला आणि त्याने मधुरा यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व चालत्या लोकलमधून उडी टाकून पोबारा केला. या प्रकरणी मुंबई सेट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी निरीक्षक अरशुद्दीन शेख, निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनीटच्या पथकाने तपास सुरू केला. मग पथकाने शिताफीने माहिती काढत वाडीबंदर येथील झोपडपट्टीत राहणारा मतिउर हकीम शेख ऊर्फ आझाद खान याला पकडले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली. तसेच सोन्याचे मंगळसूत्र साथीदाराच्या मदतीने वितळविल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा साथीदार कीर्तीराम नायक याला पकडले. त्यांच्याकडून नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली.