टीसींवर हल्ला करणारे ‘पोस्टर्स बॉय’ बनणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे स्थानकांवर खुलेआम तिकीट तपासनीसांना विनातिकीट प्रवाशांकडून वारंवार होणारी मारहाण पाहून आता अशा गुन्हय़ांत कारवाई झालेल्या प्रवाशांचे ‘पोस्टर्स’ लोकल आणि स्थानकांमध्ये चिकटवण्यात येणार आहेत. तसेच टीसींनी आता एकटय़ाने दंड गोळा न करता गटागटाने डय़ुटी बजवावी अशा सूचनाही मध्य रेल्वेने दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली करणाऱया टीसींना मारहाण करण्याच्या दोन दिवसांत तीन घटना घडल्याने रेल्वे कर्मचाऱयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस विवेककुमार राय तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकात हरेराम शर्मा या वरिष्ठ तिकीट तपासनीसांना विनातिकीट प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी मारून त्यांना फलाटावर खाली ढकलून दिले होते तर अंबरनाथ येथे तिकीट तपासनीस नम्रता शेंडगे आणि कॉन्स्टेबल अनिता कांबळे यांना महिला प्रवासी मीनल घुले यांनी मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्हायरल झाल्याने खळबळ माजली. त्यामुळे टीसींना सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने शुक्रवारी मोर्चा काढत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ जैन यांची भेट घेतली.

उद्घोषणांद्वारे फुकटय़ा प्रवाशांचे प्रबोधन!

अशाप्रकारे टीसींना त्यांच्या कर्तव्यावर असताना योग्य सहकार्य करावे अशा उद्घोषणा आता लोकलच्या डब्यात आणि रेल्वे स्थानकांवर करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापकांनी दिले आहेत. तसेच टीसींनी आरपीएफची सुरक्षा मागावी, त्यासाठी हेल्पलाइनचा वापर करावा, दोघांच्या गटाने डय़ुटी बजवावी, अशा प्रकरणांत कोर्ट-कचेरीपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी कायदेशीर मदत करावी, अशाही सूचना विभागीय व्यवस्थापकांनी दिल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.