लोकल खचाखच… गर्दीत निघाला घामटा! तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉकमुळे प्रवाशांची उडाली तारांबळ

उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकर, ठाणेकर प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. ब्लॉक काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या गेल्या. पश्चिम रेल्वेवर कित्येक चर्चगेट लोकल वांद्रे व दादर स्थानकात आल्यानंतर अचानक रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेवरही लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना रेल्वे प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला.

रेल्वे रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट मेगाब्लॉक होता. तसेच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. या काळात अप-डाऊन मार्गावरील मेल, एक्सप्रेस गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे जलद गाडय़ांसह धिम्या गाडय़ांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दुपारच्या सुमारास लोकल जवळपास 20 ते 35 मिनिटे उशिराने धावल्या. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. पावसाने काही दिवस विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत फिरायला घराबाहेर पडलेल्या मुंबईकर, ठाणेकरांची लोकल प्रवासात रखडपट्टी झाली. पश्चिम रेल्वेवर अनेक चर्चगेट लोकल वांद्रे आणि दादर स्थानकांपर्यंत चालवल्या. त्यामुळे महिला, मुलांना गर्दीचे धक्के खात वांद्रे, दादरपुढील प्रवास करावा लागला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोकल फेऱयांचा गोंधळ सुरू होता. हार्बर सेवा सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद होती. रेल्वे प्रशासन ब्लॉकचे योग्यरित्या नियोजन करीत नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.

उद्घोषणांचा गोंधळ जैसे थे

मेगाब्लॉक काळात अनेक लोकल फेऱ्या आयत्या वेळी रद्द केल्या जातात. तसेच कित्येक लोकल धिम्या मार्गावरून जलद मार्गावर वळवल्या जातात. मात्र या बदलाबाबत योग्य प्रकारे उद्घोषणा केल्या जात नाहीत. त्याचा मनस्ताप प्रवाशांना रविवारीदेखील सहन करावा लागला. उद्घोषणांचा गोंधळ कायम राहिल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर धावाधाव करावी लागली. पश्चिम रेल्वेवर अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, नालासोपारा आणि विरार स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती, तर मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, भायखळा, दादर, सीएसएमटी स्थानकांत गर्दीत प्रवाशांची रेटारेटी सुरू होती.

टपोरी प्रवाशांचा लोकलमध्ये स्टंट

शनिवारी ‘बकरी ईद’चा सण साजरा करण्यात आला. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही या सणानिमित्त मुस्लिम कुटुंबीय घराबाहेर पडले होते. त्यामुळे लोकल गाडय़ांना गर्दीचे प्रमाण अधिक होते. या गर्दीचा गैरफायदा टपोरी प्रवाशांनी घेतला आणि लोकलच्या दारावर स्टंटबाजी सुरू केली होती. त्यांना रोखण्यात रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कुचकामी पडल्याचे चित्र बहुतांश स्थानकांत दिसले.