लोकलच्या प्रवासी संख्येत मात्र धिम्या गतीने वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांना लोकलची दारे खुली झाल्याने लोकलच्या दररोजच्या प्रवासी संख्येत धिम्या गतीने वाढ होत आहे. पश्चिम रेल्वेवर 21 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार लसीकरण पूर्ण झालेल्या 88 हजार 704 जणांनी रेल्वे पास विकत घेतले आहेत. तर मध्य रेल्वेवर 20 ऑगस्टच्या आकडेवारीपर्यंत 1 लाख 92 हजार 140 जणांनी रेल्वे पास विकत घेतला आहे. आतापर्यंत अशा 2 लाख 80 हजार 844 जणांनी रेल्वेचा पास विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी लोकलच्या रोजच्या प्रवासी संख्येत मात्र धिम्या गतीने वाढ होत असल्याचे चित्र आहे.

लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेल्या सामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात लोकलच्या रोजच्या प्रवासी संख्येत अत्यंत धिम्या गतीने वाढ होत आहे. मध्य रेल्वेची रोजची प्रवासी संख्या 15 ऑगस्टपूर्वी 15 लाख होती ती आता 18 लाख झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची 12 ते 13 लाख होती ती आता 15 ते 16 लाख अशी वाढली आहे. अशी उपनगरीय प्रवाशांची रोजची संख्या 34 ते 35 लाख इतकी झाली आहे.