
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या राज्यातील तब्बल 13 हजार नागरी आणि ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे लॉकडाऊनमुळे अर्थकारण बिघडणार आहे. 90 हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय असलेल्या या पतसंस्थांचा कारभार गेल्या 25 दिवसांपासून ठप्प आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे कर्ज वसुलीला खीळ बसली आहे. तर दररोज जमा होणारे सुमारे पंधरा-सोळा कोटी रुपयांचे दैनंदिन बचत ठेवींचे कलेक्शन बंद झाले आहे. याचा थेट परिणाम संस्थांच्या अर्थकारणावर होणार असून भविष्यातील वाट बिकट असल्याचे दिसत आहे.
सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली चालणाऱया पतसंस्थांनी आतापर्यंत यशस्वीपणे वाटचाल करत सर्वसामान्य सभासदांना मदतीचा हात दिला आहे. या संस्थांच्या कर्मचारी आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींची संख्या दोन लाखांहून अधिक असून साडेपाच हजार कोटी रुपयांचे भागभांडवल आहे, जवळपास 65 हजार 778 कोटीच्या ठेवी असून सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, दुकानदारी बंद असल्याने त्यांचे व्यवहार थांबले आहेत. पतसंस्थांनी याच घटकाला कर्ज वाटप केले आहे. यामध्ये मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज, तारण कर्ज, मालमत्ता खरेदीसाठी कर्ज दिले आहे. मात्र सध्या लोकांच्या हातात पैसे येत नसल्याने वसुली थांबली असून त्याचा परिणाम संस्थांच्या ताळेबंद पत्रकावर होणार आहे.
सध्या पाच-सहा टक्क्यांवर असलेले अनुउत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) पुढील काळात 15-20 टक्क्यांच्या पुढे जाईल अशी भीती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक, संचालक वसंतराव शिंदे यांनी व्यक्त केली.
लिक्विडीटी राखणे कठीण; कर्जाचे फेरतारण करावे
बँक किंवा पतसंस्था योग्यरीतीने चालवायची म्हटले तर त्याच्या एकूण व्यवहाराच्या वीस टक्के रोखता (लिक्विडटी) राखावी लागते. तरच व्यवहार सुरळीत पार पाडता येतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातात पैसे नसल्याने ते आपल्या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवी काढत आहेत, तर दुसरीकडे कर्जाची वसुली होत नाही. त्यामुळे लिक्विडीटी राखणे पतसंस्थांपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने आणि जिल्हा बँकांनी पतसंस्थांची कर्जे फेरतारण करून घेत पैसे उपलब्ध करून घ्यावेत. त्याबाबतचे निर्देश सरकारने संबंधितांना द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केली आहे.
आरबीआयप्रमाणे एनपीएत सवलत द्यावी
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकिंग क्षेत्रासाठी कर्ज वसुलीमध्ये तीन महिन्यांची सवलत दिली आहे. त्यानुसार सहकार विभागाने एनपीएच्या नियमात शिथिलता आणून पुढील सहा महिने एखादे कर्ज थकीत राहिले तरी त्याचा एनपीएत समावेश करू नये अशीही मागणी केली आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे थकीत झालेल्या कर्जाचा एनपीएत समावेश केल्यास संस्थेला सदर कर्जाच्या रकमेची तरतूद करावी लागते. त्यामुळे ती संस्था अडचणीत असल्याचे दिसेल अशीही भीती व्यक्त होत आहे.
राज्यातील सहकारी पतसंस्था वर्षानुवर्षे सक्षमपणे वाटचाल करीत आहेत. पण कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे त्या आर्थिक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना सहकार्याचा हात द्यावा.
– वसंतराव शिंदे,
संस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन



























































