
कोरोनाचा काळ नोकरदार महिलांसाठी सर्वाधिक परीक्षेचा राहिला. वर्क फ्रॉम होम करतानाच घरकाम, मुलांची आणि ज्येष्ठांची काळजी अशी तारेवरची कसरत महिलांना करावी लागली. हिंदुस्थानात 80 टक्के महिलांची लॉक डाऊनमध्ये ओढाताण झाली. त्यांना आपल्या व्यावसायिक आयुष्याचे संतुलन राखणे कठीण गेले. वुमेन अॅट वर्क या अहवालातून हे वास्तव उघड झाले आहे.
‘एस्पायर फॉर हर अॅण्ड सस्टेनेबल अॅडव्हान्समेंट’च्या सर्वेक्षणात 800 महिलांनी सहभाग घेतला. त्यात सर्वाधिक महिला कॉर्पोरेट क्षेत्रातील होत्या. त्या खालोखाल शिक्षण आणि स्वयंरोजगार करणाऱया महिलांचा समावेश होता. 38.5 टक्के महिलांनी घरातील कामांबरोबरच मुले, ज्येष्ठांची देखभाल करण्याचे काम वाढल्याचे सांगितले.
43.7 टक्के महिलांनी घर आणि ऑफिसचे संतुलन राखणे कठीण गेल्याची कबुली दिली. लॉकडाऊनचा फटका स्वयंरोजगाराच्या क्षेत्रातील 41.6 टक्के महिलांना झाला आहे, तर शिक्षण क्षेत्रातील 50.6 टक्के महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपली परिस्थिती बिघडल्याचे सांगितले.


























































