
देशातील लॉकडाऊनने कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत मोठा हातभार लावला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा कार्बन उत्सर्जन जवळपास 8 टक्क्यांनी कमी येईल, असा दावा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने गुरुवारी केला. महामारीने बरीच आव्हाने उभी केली. मात्र याचवेळी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संधी दिली, असेही संबंधित अधिकाऱयाने म्हटले.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा व्यापारावर झालेला परिणाम तसेच उभी ठाकलेली आव्हाने यासंबंधी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीने ऑनलाईन परिसंवाद आयोजित केला होता. यात पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजीत कुमार वाजपेयी यांनी सहभाग घेतला होता. लॉकडाऊनचा कोरोना संसर्ग रोखण्यासह पर्यावरणाला मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
महामारीने अर्थव्यवस्था सुरू करण्याची तसेच सुधार योजनांच्या माध्यमातून समाजाचे पुननिर्माण, जलवायू परिवर्तन आणि पर्यावरण संरक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याची संधी दिली आहे, असे वाजपेयी म्हणाले. लॉकडाऊनमुळे यंदा कार्बन उत्सर्जन साधारण 8 टक्क्यांनी कमी होईल. कन्स्ट्रक्शन, कृषी, पेय आणि खाद्य पदार्थ यांसारखे उद्योग तसेच अनेक औषधे यांचा निसर्ग हाच मूलभूत स्रोत आहे, असेही त्यांनी नमूद केले.


























































