लॉकडाऊन कारवाईत मृत्यू, मारहाणीचा आरोप असलेल्या चारही पोलिसांची ओळख पटली!

883

लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून मारहाणीचा आरोप असलेल्या चारही पोलिस कॉन्स्टेबलची ओळख पटली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.

लॉकडाऊन दरम्यान 29 मार्च रोजी राजू देवेंद्र (22) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत रात्रीच्या वेळी नातेवाईकांकडे जात असताना पोलिसांनी त्याला पकडले व जुहू पोलीस ठाण्यात नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी कुटुंबियांना सांगितले की देवेंद्र जवळच्या चौकात पडला होता आणि त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी असा दावा केला की देवेंद्र याने चोरी केली असावी व जमावाने त्याला मारले असावे. तर दुसऱ्या प्रकरणात दक्षिण मुंबईत 18 एप्रिल रोजी सागीर खान या मजुरावर पोलिसांनी कारवाई केली तो घरी परतल्यावर त्याने सहकाऱयाला या मारहाणीबद्दल सांगितले आणि तो कोसळला यात त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची दखल घेत ऍड. फिरदाऊस इराणी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणी आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी वांद्रे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले व चारही पोलिसांची ओळख पटली अशी माहिती न्यायालयाला दिली.

चौकशी अहवाल सादर करा
न्यायालयाने सविस्तर चौकशी अहवाल 6 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच चारही पोलिसांविरूद्ध कार्यवाही करण्याच्या प्रस्तावावर घेतलेल्या निर्णयाचा खुलासाही होऊ शकेल असे स्पष्ट करत सुनावणी तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या