चीनच्या हुबई प्रांतातून लॉक डाऊन हटणार; दोन महिन्यानंतर नागरिक घराबाहेर पडणार

2760

कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनच्या हुबई प्रांतातून दिलासादायक बातमी आली आहे. या प्रांतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यास यश आले आहे. त्यामुळे बुधवारपासून हुबई प्रांतातून लॉक डाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रांतातील 5.6 कोटी नागरिक दोन महिन्यांपासून घरांमध्ये कैद आहेत. त्यांना घराबाहेर पडता आलेले नाही. हुबईची राजधानी वुहान शहरही पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, अजूनही धोका कायम असल्याने या शहरात लॉक डाऊन कायम ठेवण्यात येणार आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 8 एप्रिलनंतर वुहानमध्ये निर्बंधांमध्ये ढील देण्यात येईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, वुहानमधील निर्बंध हटवताना विशेष काळजी घेण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. प्रवासावर असलेले सर्व निर्बंध बुधवारपासून हटवण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रीन हेल्थ कोड कार्डद्वारे हुबईतील नागरिक इतर प्रांतात 8 एप्रिलनंतर प्रवास करू शकणार आहेत. इतर प्रांतातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच सर्वाधिक फटका हुबई प्रांताला बसला होता. हुबईमध्ये 3160 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी चीनमध्ये कोरोनाचे 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे निर्बंध हटवताना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दोन महिन्यांच्या लॉक डाऊननंतर चीनमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मंगळवारी ‘द ग्रेट वॉल ऑफ चाइना’पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, एका दिवसात फक्त 19,500 पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या