कुकिंग, कराटे आणि बरंच काही!

328

>> किरण ढाणे, अभिनेत्री

लॉकडाऊनच्या आधीच माझी ‘एक होती राजकन्या’ सिरियल संपल्यामुळे मी साताऱयात शिफ्ट झाले होते. सुरुवातीला तिथे कोरोनाचे रुग्ण कमी होते. रुग्णसंख्या वाढू लागल्यावर मात्र लॉकडाऊन कडक झाले अन् आम्ही घरातच अडकलो. ‘लागीर झालं जी’पाठोपाठ मी ‘एक होती राजकन्या’ ही सिरियल केली. सिरियलचे शूटिंग इतके हेक्टिव असते की त्यातून आपल्या आवडीनिवडी जपायला वेळच मिळत नाही. गेल्या दोन-तीन वर्षांनंतर पहिल्यांदा मला इतका मोकळा वेळ मिळाला.

आमच्या कॉलनीत पूरेर्वी मी योगाला जायचे. लॉकडाऊननंतर सगळं बंद झाल्यानंतर मी घरीच योगा केला. वेगळ्या काही आवडीनिवडी आहेत का त्या शोधल्या. कुकिंगमध्ये आपल्याला काही जमतंय का ते पाहिलं. यू-टय़ूबवरील रेसिपीजचे व्हिडिओ बघून वेगवेगळे पदार्थ ट्राय केले. माझा भाऊ कराटेत ब्लॅक बेल्ट आहे. त्याच्याकडून कराटेच्या बेसिक गोष्टी शिकून घेतल्या. मालिका किंवा सिनेमात ऍक्शन सिक्वेन्स असतात. त्यात याचा नक्कीच उपयोग होईल. आमच्याकडे दरवर्षी जानेवारीत ग्रंथ महोत्सव असतो. त्यातून मी गेल्या वर्षी काही पुस्तकं विकत घेतली होती. त्यातलं एकही पुस्तकं वाचलं नव्हतं. या सुट्टीत मी ती सगळी पुस्तकं काचली.

माझे बाबा सिव्हील हॉस्पिटलमध्ये कौन्सिलर आहेत. त्यांना सोडण्यासाठी मी सातारा एसटी स्टॅण्डवर जायचे. त्या वेळी रस्त्यावरील कुत्रे आणि भिकारी यांची अवस्था बघून वाईट वाटायचं. त्यांच्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा मी प्रयत्न केला. कामाशिवाय घरात रिकामं बसून राहतो तेव्हा आपसूकच आपल्याला टेन्शन येतं. मनात निगेटिव्ह विचारांची मालिका सुरू होते. लॉकडाऊनमध्ये आपल्याला बाहेर पडता येत नाही म्हणून आपण नाराज होतो. परंतु बाहेरच्या जगात परिस्थिती किती बिकट आहे. ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा लोकांची अवस्था पाहिल्यावर आपण किती सुखी आहोत हे आपल्याला जाणवतं. त्यामुळं आयुष्यात सतत तक्रार करत बसू नका. आहे त्या परिस्थितीत पॉझिटिव्ह राहा. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्या. आनंदी राहा आणि आपल्यासह कुटुंबीयांची काळजी घ्या!

आपली प्रतिक्रिया द्या