
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा, उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे रोजगार बुडत असल्याने भाड्याच्या घरात रहात असलेले कुटुंब घरभाडे कसे भरावे या विवंचनेत आहेत. मात्र घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. तसेच घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये असे निर्देश गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना देण्यात आल्या आहेत. याबाबत एक परिपत्रक जरी करण्यात आले आहे.
जगभरात सध्या कोरोना विषाणूचा थैमान सुरू आहे. देशातही कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन असून तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, उद्योग-धंदे, कारखाने आणि एकूणच सर्व आर्थिक गतीविधी बंद आहेत. याचा सर्व सामान्य लोकांच्या रोजगारावरही परिणाम झाला असून उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. यामुळे नागरिकांना अभूतपूर्व समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे घरभाडे थकले असून अनेकांना नियमितपणे घरभाडे भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. तसेच घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या दिशानिर्देशांमुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.



























































