लॉक डाऊनमध्ये कोहलीने कोट्यवधी कमावले

2191

लॉक डाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काही उद्योगधंदेही बुडाले. गेल्या अडीच महिन्यांपासून क्रीडाविश्वही ठप्प असल्याने अनेक खेळाडूंनाही आर्थिक चणचण भासल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने घरबसल्या जवळपास 3.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवरील खेळाडूंच्या या कमाईत कोहली सहाव्या स्थानावर असून, स्टार फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप-10 मध्ये विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. 12 मार्च 14 मे या कालावधीत खेळाडूंनी पोस्टवर केलेल्या कमाईचा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोहलीने लॉक डाऊनच्या काळात तीन स्पॉन्सर पोस्ट केल्या अन् त्यातून त्याला 3 कोटी 60 रुपयांची कमाई झाली. याचाच अर्थ विराटने एका पोस्टमधून जवळपास 1.2 कोटी रुपयांची कमाई केली. इन्स्टाग्रामवर कोहलीचे 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोने सर्वाधिक 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 22.2 कोटी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्येही रोनाल्डोच अव्वल स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवरील कमाईमध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनल मेस्सी दुसऱ्या, तर ब्राझीलचा ज्युनियर नेमार तिसऱ्या स्थानावर आहे. स्टार बास्केटबॉलपटू शकील ओ नील या यादीत चौथ्या, तर माजी फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम पाचव्या स्थानावर आहे.

इन्स्टाग्रामवरील खेळाडूंची कमाई (कोटीमध्ये)

cri

आपली प्रतिक्रिया द्या