लॉकडाऊनमध्ये उपासमारीने 30 कावळ्यांचा बळी; उल्हासनगरच्या कॉलेज कॅम्पसमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना अन्न-धान्य पुरवण्यासाठी अनेक संस्था, समाजसेवक आणि दानशूर मंडळी पुढाकार घेत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात उल्हासनगरच्या चांदीबाई कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कुणीच येत नसल्याने कॅम्पसच्या झाडांमध्ये घरटी असणाऱ्या तब्बल 30 कावळ्यांचा अन्न-पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चांदीबाई कॉलेज प्रशासनाने कॉलेज कॅम्पसमध्ये लावलेली झाडे मोठी झाल्याने याठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. त्यामुळे पक्षांचा किलबिलाट आणि कावळ्यांची कावकाव कानावर पडत होती. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी झाडाच्या सावलीत बसून घरचे आणलेले जेवण जेवून त्यापैकी काही या पक्षांना-कावळ्यांना टाकत होते. याशिवाय समोरच उल्हासनर रेल्वे स्थानकाचा स्कायवॉक असून त्याच्या कोपऱ्यावर पक्षीप्रेमी बिस्कीट-शेव-धान्य टाकत होते. विशेषतः कावळे त्यावर ताव मारून पुन्हा कॅम्पसच्या झाडांवरील घरट्यात येत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. रेल्वेसेवा बंद असल्याने स्कायवॉकवर वर्दळ नाही. त्यामुळे कावळे अन्न-पाण्यावाचून तडफडून जीव सोडत असल्याची माहिती कॅम्पसच्या सुरक्षा रक्षकाने दिली.