मेल-एक्प्रेसवरील धडक कारवाईत सुमारे चार लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरेकडून आलेल्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने छेडलेल्या मोहिमेत एकाच आठवडय़ात 291 केसेस दाखल करीत 3.82 लाखांचा दंड वसुल केला आहे.

मध्य रेल्वेचे दक्षता पथक आणि मुंबई विभागाचा तिकीट तपासणी करणारा स्टाफ अशा दोन्ही पथकांनी कसारा आणि दादर दरम्यान उत्तरेकडून आलेल्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये धडक कारवाई केली. उत्तरेकडून मुंबई येणाऱया अप ट्रेन क्र.02533, 01094 आणि 02541 या गाडय़ांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यातील ट्रेन क्र.01094 या एका ट्रेनवरील कारवाईत 87 प्रकरणे दाखल होऊन 1 लाख 10 हजार 210 रूपयांचा दंड वसुल झाला आहे. एकूण तीन ट्रेन मिळून 3.82 लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिक कोटय़ाचा गैरवापर, बदललेल्या तिकिटांवर प्रवास करणे, सिस्टम तिकिटांचे ई-तिकिटात चुकीचे रूपांतरण, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्ससह प्रवास करणे, बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास, तिकिटांचे हस्तांतरण करणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठा अधिकृत रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने आहे.