रत्नागिरीत 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी ‘मिशन ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याची मुदत आता 15 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जून महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने आणि प्रवासाचा कोणताही इतिहास नसतानाही काही कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 1 ते 8 जुलैदरम्यान रत्नागिरीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत पूर्वीचे लागू असलेले निर्बंध 15 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

गावात दुकाने सुरू ठेवण्याची सवलत

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिल करून कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले. यानुसार परिशिष्ठ ‘ब’मध्ये 5 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावातील सर्व दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र या दुकानांत 60 वर्षांपुढील व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुले यांना सामान खरेदी करता येणार नाही. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला खरेदीची मुभा असेल. याखेरीज यापूर्वी जारी केलेल्या आदेशातील सर्व निर्बंध 15 जुलै 2020 च्या मध्यरात्री 12 पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.