जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथील गावठी हातभट्टीवर छापे; 46 हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील वाटूर फाटा येथे सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारुच्या दोन अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने छापे मारुन हातभट्टी व रसायन मिळून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 23 मे रोजी करण्यात आली.

जालना जिल्ह्यात व शहरात लॉकडाऊनच्या अनुषंगाने अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे काही जण स्वतःच्या घरात गावठी हातभट्टी दारु तयार करीत असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाटूर फाटा येथील बंजारा कॉलनीमध्ये आरोपी अंबादास नागोराव जाधव रा. बंजारा कॉलनी, वाटूर फाटा, ता. परतुर याच्या घरी छापा मारला असता घराच्या बाजुला ड्रममध्ये गावठी हातभट्टी दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असे 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या ठिकाणी वाटूर फाटा येथील शंभू महादेव शाळेच्या बाजुला आरोपी दशरथ अर्जुन चव्हाण यांच्या घराच्या समोर अंगणाची पाहणी केली. त्याठिकाणी दोन ड्रममध्ये गावठी हातभट्टी दारु व रसायन मिळून 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल दोन्ही ठिकाणाहून जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुध्द परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या