
मार्च 22 रोजी झालेल्या जनता कर्फ्यु पासून संगमेश्वर कोल्हापूर या राज्य मार्गाचे काम लोवले मयुरबाग येथपर्यंत येवून थांबले होते. मात्र राज्य शासनाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक शासकीय बांधकामे पूर्ण करण्यास परवानगी दिल्याने ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घेत लोवले ते मयुरबाग पर्यंतचे काम सुरु केले असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गाचे काम साधारण दोन वर्षांपूर्वी सुरु झाले. या 32 किमीच्या मार्गासाठी 32 कोटींचा निधी राज्यशासनाने मंजूर केला होता. मात्र या कामात काहीनाकाही अडथळे येत गेल्याने हे काम रखडले होते. अखेरीस 4 डिसेंबर 2019 रोजी साखरपा पासून रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. काम पूर्ण करत ठेकेदार लोवले मयुरबाग पर्यंत आला होता. लोवले ते संगमेश्वर हे केवळ तीन किमीचे काम बाकी राहिले होते. 22 मार्चला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर पूर्ण लॉकडाऊन झाले आणि हे काम पूर्णत: बंद पडले. 32 किमींपैकी 29 किमींचे काम झाले आणि ज्या भागात अधिकाधिक खड्डे आहेत ते लोवले संगमेश्वर हे अखेरच्या टप्प्याचे काम रखडले . तब्बल एक महिना काम रखडल्याने कामगार वर्ग ठेकेदार, वाहनचालक, पादचारी, ग्रामस्थ सर्वच त्रस्त झाले होते.
पावसाळ्यापूर्वीची अपूर्ण शासकीय बांधकामे पूर्ण करण्यास शासनाने नुकतीच परवानगी दिल्यानंतर ठेकेदारांनी रखडलेल्या या रस्ता कामाला प्राधान्य देवून अत्यंत वेगाने हे काम सुरु केले आहे. रस्ता काम करतांना सर्व कामगारांना मास्क देण्यात आले असून सोशल डिस्टंसींग पाळण्याची देखील खबरदारी घेतली जात आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भारती या कामावर लक्ष ठेवून आहेत . येत्या आठवडाभरात हे रस्ता काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास ठेकेदारांनी व्यक्त केला आहे . या रस्त्यावर असणारे कार्पेट कोटींग मात्र पावसाळ्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
































































