तिसरी घंटा जोरात वाजणार! रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन…

रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत… असे गाऱहाणे पुन्हा ठाण्यातील नाटय़गृहांमध्ये पुन्हा जोरकसपणे गुंजणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली नाटय़गृहे पुन्हा सुरू करताना नाटय़कर्मींना नवी उभारी देण्यासाठी ठाणे पालिकेने पुढाकार घेतला आहे. शहराचे मानबिंदू ठरलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या पालिकेच्या दोन नाटय़गृहांच्या भाडय़ांमध्ये तब्बल 75 टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे भाडेसवलत देणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा फटका नाटय़निर्मात्यांनादेखील बसला आहे. राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर नाटय़निर्मात्यांनी महापालिकेच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार महापौर यांनी नाटय़गृहाचे भाडय़ांमध्ये सवलत देण्याबाबतचे पत्र प्रशासनास दिले. प्रशासनानेदेखील परिस्थितीचा सकारात्मक विचार करून ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहांचे भाडे 25 टक्के आकारून उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काढला आहे. त्यामुळे नाटय़कर्मी, कलाकार आणि या व्यवसायाशी संबंधित असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच ठाण्यात नाटकाची तिसरी घंटा ऐकायला मिळणार आहे.

  • लॉकडाऊनच्या आधी या दोन्ही नाटय़गृहांसाठी 5500 ते 6500 पर्यंतचे भाडे आकारण्यात येत होते, मात्र आता 400 रुपये तिकिटाच्या मूळ दरापर्यंत केवळ 25 टक्के नाटय़गृहाचे भाडे आकारले जाणार आहे.
  • 400 रुपयांच्या वर तिकीट दर आकारल्यास मात्र कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच ही सवलत सामाजिक संस्था, कंपन्या, क्लब, खासगी कार्यक्रमांना नसेल, असेही पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.

गेले आठ महिने नाटय़गृहे बंद असल्याने त्याचा फटका नाटय़कर्मींनाही बसला आहे. आता राज्य सरकारने नाटय़गृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे, पण 50 टक्के आसनाची अट असल्याने नाटय़कर्मींचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून सवलत मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. ती आज ठाणे पालिकेने पूर्ण केली आहे. –  नरेश म्हस्के, ठाणे महापौर

  • राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहांच्या तिकिटांचे किमान दर 50 ते कमाल रुपये 150 रुपये असे आहेत. हे दर 31 मार्च 2021 पर्यंत जास्तीत जास्त 400 रुपये ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या