‘टेनेट’मुळे बॉक्स ऑफिसवर आशेचा किरण, तीन दिवसांत केले चार कोटींचे कलेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीनंतर आठ महिन्यांनी देशभरातील थिएटर पुन्हा सुरू झाले आहेत. परंतु जुन्या चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली होती. हळूहळू बॉक्स ऑफिस आता सावरताना दिसतोय. ‘टेनेट’ या हॉलीवूडपटाने तीन दिवसांत हिंदुस्थानात 4.25 कोटी रुपयांची कमाई केल्यामुळे बॉलीवूडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ख्रिस्तोफर नोलान यांचा ‘टेनेट’ हा चित्रपट शुक्रवारी हिंदुस्थानात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची हिंदुस्थानी चाहतेदेखील आतुरतेने वाट पाहत होते. 1100 हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 50 टक्के प्रेक्षकांची अट असतानाही शुक्रवारी या चित्रपटाने 1.2 कोटी, शनिवारी 1.4 कोटी आणि रविवारी 1.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कलेक्शनमुळे बॉक्स ऑफीसला बऱयाच दिवसांनी ’अच्छे दिन’ आले आहेत. ‘टेनेट’मध्ये जॉन डेव्हिड वॉशिंग्टन यांची मुख्य भूमिका असून डिंपल कपाडिया याद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करतायत. मुंबईच्या विविध भागांत या चित्रपटाचा काही भाग शूट झाला आहे.