
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि सर्वच मंडळी घरात अडकून पडली. वाचनालये, पुस्तकांची दुकाने बंद झाली होती. वाचकांच्या वाचनप्रेमात खंड पडला. अशा वेळी राज्यभरातील कथाकार एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी आपल्या कथा ग्रुपवर शेअर करायला सुरुवात केली. बघता बघता या कथांना राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्यातील निवडक दर्जेदार कथा पुस्तकासाठी निवडण्यात आल्या आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सुरू झालेला कथाकारांचा प्रवास कथासंग्रहाच्या रूपाने वाचकांसमोर आला. ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ असे या कथासंग्रहाचे नाव आहे. लवकरच त्याचे ऑनलाईन प्रकाशन होणार आहे.
पुणे येथील कथालेखक बबन पोतदार यांनी लॉकडाऊनमध्ये हा अभिनव प्रयोग केला. त्यांनी 24 मार्च 2020 रोजी व्हॉट्सअॅपवर कथाप्रेमी नावाचा ग्रुप निर्माण केला. सुमारे 250 सदस्यांच्या ग्रुपवर ते रोज एक कसदार कथा पोस्ट करू लागेल. कथेसोबत ते लेखकाचा परिचय तसेच कथेमागची कथा अशी माहिती देऊन ग्रुपवर चर्चा घडवू लागले. या कथांवर परीक्षणही होऊ लागले. यातील कथा अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर होऊ लागल्या. गावोगावी त्यांना वाचक वर्ग मिळाला. कालांतराने यातीलच निवडक कथांचा संग्रह करण्याची कल्पना लेखक प्रताप गंगावणे यांनी मांडली. त्यातूनच 20 कथांचे पुस्तक गेल्याच महिन्यात साकार झाले आहे. प्रत्येक कथाकाराने या कथासंग्रहासाठी आर्थिक योगदान दिले आहे. त्यातून 290 पानी कथासंग्रह वेदांतश्री प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे. लवकर त्याचे प्रकाशन होईल.
नवोदितांना व्यासपीठ
सोशल मीडियाच्या जंजाळात लेखन आणि वाचन चळवळ हरवली आहे अशी ओरड होते. मात्र याच माध्यमाचा अभिनव वापर करत प्रातिनिधिक कथासंग्रह निर्माण करण्यात आला आहे. सततच्या काॅपी पोस्ट आणि फॉरवर्डमधून बाहेर काढून लिहितं करण्याचा हा प्रयत्न होता. वेगवेगळ्या प्रांतातील, भिन्न बोलींच्या सदस्यांनी आपण कथाप्रेमी असल्याचे दाखवत कथा लिहिल्या. त्यावर चर्चा घडवल्या आणि लेखकांना प्रोत्साहित केले. दिग्गज लेखकांबरोबर नवोदितांनाही व्यासपीठ मिळवून दिले.
प्रादेशिक गोडवा आणि परंपरा
‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ या कथासंग्रहात बबन पोतदार, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते, कौलस वाघमारे, राजेंद्र अत्रे, सुनील वेदपाठक, डॉ. राजश्री पाटील, हरिशचंद्र पाटील, शंकर पाटील, दीपक लोंढाळ, प्रकाश महामुनी, गुणवंत पाटील, बबन कदम आणि आशा पाटील या 20 लेखकांच्या कथांचा समावेश आहे. यात कुणी न्यायाधीश तर कुणी सरकारी अधिकारी तर कुणी वकील, पत्रकार, डॉक्टर, शेतकरीदेखील आहे.
कथाप्रेमी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये महाराष्ट्र, बेळगाव सीमा भागातील विविध भागात नोकरी, उद्योग करणाऱया लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरीती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. हा साहित्यिक गोडवा वाचायला वाचकांना कथासंग्रहाच्या रूपाने अनुभवता येईल, असे बबन पोतदार यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.



























































