टोळधाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. कल्पना पाटील-कुऱ्हाडे

कोरोनासोबत सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांत टोळधाडीचे संकटही घोंगावते आहे. शेतातील उभे पीक फस्त करणारे हे टोळ नेमके काय असतात, ते पिकांवर `धाड’ कशी टाकतात, त्यावर नियंत्रणाचे उपाय कोणते आहेत याविषयी….

कोरोना संकटाचा सामना करत असताना आणखी एका नैसर्गिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागतोय. पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिह्यात धडक दिली आहे. या भागातील संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या किटकांनी मोठं नुकसान केलं आहे. वाऱयाचा वेग आणि दिशेमुळे या टोळधाडी दक्षिण-पश्चिमेकडे पुढे सरकत आहेत. यामुळे शेतकरीबंधू धास्तावले आहेत.

टोळाचे इंग्रजी भाषेतील `लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ `जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. हिंदुस्थानात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठय़ा प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते.

वाळवंटी टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय व जागतिकदृष्टय़ा महत्त्वाची कीड आहे. नाकतोडय़ाच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. याच्या तीन प्रकारच्या प्रजाती (एजम्गे) आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट म्हणजेच वाळवंटी टोळ हे तांबूस रंगाचे असतात. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीस एकाकी (एदत्ग्tarब् ज्प्asा) स्थिती म्हणतात. अनुकूल हवामानात टोळांची संख्या पुष्कळ वाढते, त्याचे थवे तयार होतात व त्यांना भ्रमण करावेसे वाटते. ह्या स्थितीस थव्याची स्थिती (उrाgarग्दल्s ज्प्asा) म्हणतात.

टोळांची सर्व पिल्ले एकत्र येऊन मोठय़ा थव्याने वाटेतील वनस्पतीचा फडशा उडवत पुढे सरकतात. अशाप्रकारे हे थवे पुढे सरकत असताना सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वस्तीस राहतात. पूर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील प्रौढ टोळ तांबूस रंगाचे असतात. अतिशय चपळ व खादाड असतात. ही टोळधाड पिकांचे जास्तीत जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळधाड दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून फार मोठा धोका असतो. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी व पालवी आदींचा टोळ फडशा पाडत असतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ 3000 क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा 6 ते 8 पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळय़ा रंगाचे होतात, असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशी ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. टोळाचे थवे ताशी 12 ते 16 किमी वेगाने उडतात.

नियंत्रणाचे उपाय
टोळांची सवय थव्याथव्याने एका दिशेने दौडत जाण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाऱया थव्यांच्या वाटेवर 60 सेंमी रुंद व 75 सेंमी खोल चर खणून त्यात या पिलांना पकडता येते
अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करून नियंत्रण करता येते. अंडी शोधून सामूहिकरीत्या नष्ट करावीत.
संध्याकाळी वा रात्रीच्या वेळी झाडा-झुडपावर टोळ जमा होतात. अशा वेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते.
थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास नीम तेल प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी करणे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
मेटा-हायझीयम ऍक्रिडियम व मायक्रोस्पोरियम, पॅरानोसेमा लोकस्टी (पूर्वीचे नाव नोसेमा लोकस्टी) या जैविक कीटकनाशकांचा वापर अनेक देशांत केला जातो.
विष आमिषाचा वापर : गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनील 5 एस.सी. व 2.92 ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी 20-30 किलो याप्रमाणे फोकून द्यावे. जेणेकरून, सदर आमीष खाल्ल्यावर किडीचा मृत्यू होईल.

(लेखिका श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे कीटक शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आहेत.)

[email protected]