
लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेत स्थानिक नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र आता या जागेवर महायुती सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांची वक्रदृष्टी पडली असून एका खासगी संस्थेच्या माध्यमातून ती जागा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेने त्याला जोरदार विरोध केला असून ‘लोढा हटाव… मुंबई बचाव’ असा नारा देत उद्या करीरोड येथे उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
लोअर परळ येथे नवे उड्डाणपूल बांधले गेल्यानंतर त्याखाली मोठय़ा प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. त्या जागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरिता गार्डन तसेच तरुणांकरिता ओपन जिम आदी सुविधा निर्माण केल्या जाव्यात यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी आणि पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता.
लोअर परळच्या पुलाखालील मोकळी जागा खासगी संस्था किंवा पेंद्राला देणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे आंदोलन 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करीरोड नाका येथील मुंबई दरबार हॉटेलसमोर होणार आहे.


























































