
शहरात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी लोहगावमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 5 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. धनकवडी परिसरात सराफाचे दुकान फोडून पावणे तीन लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी विमानतळ व सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगावमधील यशवंत पार्क येथे राहणारे तुळशीराम पाटोळे (वय 56) यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 4 लाख 90 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोळे फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास फ्लॅटचे कुलूप तोडून दीड लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपी सीसीटीव्हीत दिसत असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धनकवडी परिसरात राहणारे किसन गांधी (वय 45) यांचे ललित सराफ अँन्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री रात्री नऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरची हुकपट्टी गॅस कटरने कापले.
आत प्रवेश करत काउंटरमध्ये ठेवलेले सोन्या व चांदीचे दागिने असा 2 लाख हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. गांधी यांना दुकानात चोरी झाल्याचे समजताच सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सीओईपीमधून 53 हजाराचे साहित्य चोरीला
शिवाजीनगरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून चोरट्यांनी पाईप, सीड बॅटरी, वेल्डींग मशीन, प्रिन्टर असे 53 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी कॉलेजचे प्राध्यापक यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.




























































