
बिहारमध्ये राजकीय भूकंपाने मोठी खळबळ उडाली आहे. लोक जनशक्ती पार्टीमध्ये उभी फूट पडली असून पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरुद्ध त्यांचे काका पशुपती पासवान यांच्यासह पाच खासदारांनी बंड पुकारले आहे. या सर्वांनी स्वतंत्र पक्षाच्या मान्यतेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. हे खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. या बंडखोरीने पासवान काका-पुतण्यातील छुपा संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे.
पशुपती पासवान यांच्यासह प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केसर या खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्वजण विधानसभा निवडणुकीपासूनच चिराग यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांनी स्वतंत्र पक्षासाठी केलेल्या विनंतीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कायदेशीर बाबींची पडताळणी करून निर्णय देणार आहेत. त्यावर लोक जनशक्ती पार्टीचे भवितव्य ठरणार आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यानंतर चिराग यांचे संभाव्य मंत्री म्हणून नाव समोर आले होते. मात्र जेडीयूने त्यांच्या नावावर तीव्र आक्षेप घेतला होता. एनडीएच्या बैठकीमध्ये जेडीयूने आक्षेप नोंदवल्यानंतर चिराग यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले होते. चिराग यांच्यामुळेच विधानसभेच्या काही जागा गमवाव्या लागल्याची नाराजी जेडीयूमध्ये आहे.
मला पक्ष तोडायचा नाही, वाचवायचाय – पशुपती पासवान
मला पक्ष तोडायचा नाही, तर वाचवायचा आहे. पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे म्हणून पक्षाला वाचवले पाहिजे, अशी आम्हा पाच खासदारांची इच्छा आहे. चिरागबाबत कुठलीही तक्रार नाही. ते आमचे पुतणे आहेत. ते पक्षात असले म्हणून आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ते म्हणाले. बिहारमध्ये आमची स्थिती मजबूत आहे. आम्ही एनडीएसोबत होतो आणि पुढेही राहणार आहे. नितीश कुमार हे चांगले नेते आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
आज से मर गये चाचा…!
रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चार दिवसांनी आणि बिहार निवडणुकीआधी पशुपती पासवान यांनी नितीशकुमार यांची प्रशंसा केली होती. त्यामुळे चिराग पासवान प्रचंड नाराज झाले होते. त्याच रागातून त्यांनी पशुपतींना थेट पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर, तुम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्य मानणार नसल्याचेही सुनावले होते. त्यावर ‘आज से तुम्हारे लिए चाचा मर गए’, असे तडकाफडकी प्रत्युत्तर पशुपती पासवान यांनी दिले होते. तेव्हापासून काका-पुतण्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते.




























































