Lok sabha 2019 : सत्तेत होते तेव्हा जनतेचे 12 लाख कोटी लुटले; भाजपचा काँग्रेसला टोला

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चौकीदाराची गरज श्रीमंतांना असते, गरीबांना नाही असे ते म्हणतात. पण, ते सत्तेत होते तेव्हा जनतेचे 12 लाख कोटी लुबाडले. त्यामुळे कुणाला चौकीदाराची गरज आहे आणि कुणाला नाही हे त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला लगावला.

जे जामिनावर बाहेर आहेत आणि ज्यांचे कुटुंब, मालमत्ता अडचणीत आहे, जे स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय कायदेशीर कारवाईला तोंड देत आहेत त्यांचा ‘मै भी चौकीदार’ मोहिमेला विरोध असल्याचेही रविशंकर म्हणाले. तसेच बंगळुरूत आयटी क्षेत्रातील काही लोकांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. ही अत्यंत खेदजनक बाब असून हिंदुस्थानवासीयांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका करतात. पण, उलट आम्हाला नाही, तर राहुल गांधींना बरेच शिकण्याची गरज असल्याचेही रविशंकर म्हणाले.

मतांसाठी ते चौकीदार म्हणवून घेत आहेत

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वतःला चायवाला म्हणवून घेतले आता मतांचा जोगवा मागण्यासाठीच पुन्हा चौकीदार म्हणून प्रचार करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. विकास विचारतोय , लोकांच्या बँक खात्यातून जे पैसे चोरी होत आहेत ते पैसे वाचवण्यासाठी कुणी चौकीदार आहे का? विकास विचारतोय ,राफेलची फाईल चोरी करणाऱया चौकीदाराला शिक्षा झाली का असे सवालही अखिलेश यांनी केले आहेत.

500 ठिकाणी मोदी लोकांशी करणार चर्चा

विरोधकांनी चौकीदार चोर है अशी टीका केल्यानंतर भाजपाने   ‘मै भी चौकीदार’ असे प्रत्युत्तर देत त्याचा निवडणूक प्रचारात वापर करण्याचा निर्णय घेतला. आता ही मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार असून पंतप्रधान मोदी तब्बल 500 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून लोकांशी विविध मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. ‘मैं भी चौकीदार’ अशी शपथ घेणाऱ्यांची 31 मार्च रोजी ते संवाद साधणार आहेत. डॉक्टर, व्यावसायिक, शेतकरी, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह उद्योग, नाटक-सिनेमा क्षेत्रातील लोकांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. या अभियानाबाबत रविशंकर प्रसाद यांनी आज याबाबत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या