Lok sabha 2019 सातव दिल्लीत; संभ्रम गल्लीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश पाटील । हिंगोली

हिंगोली येथील काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव हे पक्षीय जबाबदारीमुळे मागिल 8 दिवसापासून गुजरात व दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला 19 मार्च पासून सुरुवात होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व गल्लीत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षांतर्गत गटबाजी व शिवसेनेच्या धास्तीमुळे सातव हे निवडणुकीच्या रिंगणात राहतील की नाही, याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातुन जिंकलेल्या नांदेड व हिंगोलीच्या दोन्ही जागचे उमेदवार काँग्रेसने पहिल्या यादीत जाहीर केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे करतात. काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी म्हणुन त्यांच्यावर जबाबदारी आहे. लोकसभा लढविण्यासाठी सातव यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार काँग्रेसकडे नाही. 2014 ला नांदेडमधून अशोक चव्हाण तर हिंगोलीतून राजीव सातव असे दोनच खासदार काँग्रेसचे निवडून गेले होते. काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, नांदेड व हिंगोलीच्या उमेदवारीचा यामध्ये समावेश नव्हता. यावरुन काँग्रेसमधील गटबाजीची किनार ठळकपणे समोर आली आहे. अशोक चव्हाण व राजीव सातव या दोघात सुप्त संघर्ष सुरु आहे. पक्षातुनच दगा-फटका नको यासाठी सातव यांचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जाते. 2019 ची निवडणूक सातव लढवतील की नाही याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला असून त्यांचे निकटचे कार्यकर्ते देखील आपसात काय होईल, याची चर्चा करत आहेत. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचा बोलबाला पाहता सातव यांना ही निवडणुक चांगलीच जड जाणार आहे. एकीकडे पक्षांतर्गत गटबाजी आणि दुसरीकडे शिवसेनेची धासती यामुळे सातव सावध पाऊले टाकत असल्याचे बोलले जाते. गुजरातची पक्षीय जबाबदारी असल्यामुळे तेथील उमेदवार निश्चिती व अन्य प्रक्रियेसाठी मागिल 8 दिवसापासून सातव हे सुरुवातीला पाच दिवस गुजरातला व त्यानंतर दिल्ली मुक्कामी ठाण मांडुन असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समवेत चर्चा करुन येत्या दोन दिवसात सातव हे हिंगोलीत येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेतील. मी निवडणूक लढविणार नाही, असे कधी म्हणालोच नाही, असे म्हणत सातव यांनी या संदर्भातील चर्चेत आणखी संभ्रम वाढविला आहे.