
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने रविवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासोबतच देशभरातील सर्व जागांवर व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. vvpt मुळे आपण दिलेले मत योग्य माणासाच पडले आहे, याची खात्री मतदारांना करता येणार आहे. या नवीन व्हीव्हीपॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने यंदा सर्व जागांसाठी मतदारांना त्यांनी केलेल्या मतदानाची पावती व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मिळणार आहे. त्यामुळे आपले मत योग्य उमेदवारालाच पडल्याची खात्री मतदारांना करता येणार आहे.
निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला फॉर्म 26 भरावा लागणार आहे. देशभरात सुमारे 10 लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 2014 मध्ये देशभरात 9 लाख मतदान केंद्र होते. यंदा या केंद्रांमध्ये एक लाखाने वाढ झाली आहे. यंदा मतदानासाठी सर्व मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. तसेच सर्व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रचारासाठी इको- फ्रेंडली सामग्री वापरण्याची सूचनाही आयोगाने केली आहे. उमेदवार फक्त तीन वेळा कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकणार आहे. प्रत्येक उमेदवाराला पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. तसेच उमेदवार रात्री 10 ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीवर्धकाचा वापर करू शकणार नाहीत. सोशल मिडियावर जाहिरातीसाठी खर्च केलेली रक्कमही उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरण्यात येणार आहे. तसेच उमेदवाराला आपल्या सोशल साइडची माहितीही द्यावी लागणार आहे.
या निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014 च्या तुलनेत सुमारे 7 लाख मतदार वाढले आहेत. दीड कोटी मतदार 18 ते 19 वर्षांचे आहेत. देशातील 99.3 टक्के मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र आहे. निवडणुकींच्या तारखांची घोषणा झ्लायनंतर 10 दिवसांनी मतदारयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही. लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी 49,922 मतदार आहेत. तर मलकाजगिरी मतदारसंघात सर्वात जास्त 31,83,325 मतदार आहेत.
21 शतकात जन्मलेल्यांचे पहिले मतदान
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 21 शतकात जन्मलेली मुले पहिल्यांदाच यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगभरात सुमारे 40 देशांमध्ये लोकशाही आहे. मात्र, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका होणारा हिंदुस्थान हा एकमेव देश असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले.
























































