
अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 11 तारखेला होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरचाही समावेश आहे. मतदानासाठीची तयारी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून बुधवारी सर्व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रवाना करण्यात आले आहेत. पोलिसांनीही आजपासून बंदोबस्त तैनात केलाय.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 2161 मतदान केंद्र असून, यातील 52 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले. या केंद्रांवर अतिरिक्त पोलिस तैनात केले जाणार आहेत. बुधवारी सकाळी मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं. मतदानयंत्रांची तपासणी करण्यात आली आणि ती सीलबंद करून कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. ही मतदानयंत्रे घेऊन कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांकडे रवाना झाले आहेत. मतदानयंत्रे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण 9 हजार 103 कर्मचारी या व्यवस्थेत सहभागी झाले असून, 4 हजार 142 पोलिस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या विधानसभा मतदरासंघांचा समावेश होतो.





























































