
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला राज्यातल्या 14 मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यापैकी बारामती, नगर व माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज आणि मातब्बर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांच्या, नगरमध्ये विखे-पाटील व रावेरमध्ये खडसे कुटुंबीयांच्या राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर आता रविवार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद (संभाजीनगर), रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण अनेक दिग्गज नेत्यांची मुले या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. अपत्य व कुटुंबीयांच्या राजकीय भवितव्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील व भाजपचे एकनाथ खडसे यांनी सुनेच्या प्रचारासाठी स्वतः मतदारसंघात तळ ठोकून प्रचाराची रणनीती आखली आहे. या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अशा दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. बारामतीमध्ये अमित शहा यांनी केलेल्या प्रचारसभेत तर बारामतीच्या मुळावरच घाव घाला असे वक्तव्य केले होते.
राधाकृष्ण विखे-पाटील भाजपच्या प्रचारात
नगरमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे डॉ. सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे उमेदवार असलेले त्यांचे पुत्र डॉ. सुजय पाटील यांच्या प्रचारात उघडपणे उतरले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन अशा दिग्गज नेत्यांनी सुजय यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी प्रचारसभांची राळ उठवली.
माढय़ातील लढतीकडे लक्ष
माढय़ातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला केली. नंतर माढा येथून शरद पवार निवडणूक लढवणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. संजय शिंदे हे भाजपचे नेते होते, पण त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दुसरीकडे सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. आता माढा लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे संजय शिंदे व महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीमध्ये प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा परंपरागत मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. दहा वर्षांच्या खासदारकीचा अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे विरोधात महायुतीच्या कांचन कुल अशी ही लढत आहे. भाजपसाठी ही लढत प्रतिष्ठsची आहे, तर पवार कुटुंबीयांची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने पवार कुटुंबीयांना लक्ष्य करीत पवार कुटुंबीयांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य म्हणजे शरद पवारांना बारामतीच्या प्रचारातच अडकवून ठेवण्याची भाजपने व्यूहरचना केली आहे.
मतदारसंघातील प्रमुख लढती
- जळगाव – शिवसेना-भाजप महायुतीचे उन्मेष पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे गुलाबराव देवकर, वंचित बहुजन आघाडी अंजली बाविस्कर.
- रावेर – महायुतीच्या रक्षा खडसे, महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील.
- जालना – महायुतीचे रावसाहेब दानवे विरोधात महाआघाडीचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे.
- औरंगाबाद (संभाजीनगर) – महायुतीचे चंद्रकांत खैरै, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील व महाआघाडीचे सुभाष झांबड
- रायगड – महायुतीचे अनंत गीते विरोधात महाआघाडीचे सुनील तटकरे
- पुणे – महायुतीचे गिरीश बापट विरोधात महाआघाडीचे मोहन जोशी.
- बारामती – महाआघाडीच्या सुप्रिया सुळे विरोधात महायुतीच्या कांचन कुल.
- नगर – महायुतीचे डॉ. सुजय विखे-पाटील विरोधात महाआघाडीचे संग्राम जगताप.
- माढा – महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे संजय शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. विजय मोरे.
- सांगली – महायुतीचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर.
- सातारा – महायुतीचे नरेंद्र पाटील विरोधात महाआघाडीचे उदयनराजे भोसले.
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – महायुतीचे विनायक राऊत विरोधात महाआघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर व स्वाभिमानचे नीलेश राणे.
- कोल्हापूर – महायुतीचे प्रा. संजय मंडलिक, महाआघाडीचे धनंजय महाडिक व वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण माळी
- हातकणंगले – महायुतीचे धैर्यशील माने विरोधात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी व वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद
























































