
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजदरम्यान शुक्रवारी एकदिवसीय क्रिकेट मालिकेला प्रारंभ होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा उपकर्णधार लोकेश राहुलला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले असून तो वेस्ट इंडीजमधील मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो बरा झाला होता आणि या आठवडय़ाच्या अखेरीस तो वेस्ट इंडीजला जाणार होता. लोकेश राहुलला वेस्ट इंडीज मालिकेसाठी टी-20 संघात स्थान देण्यात आले होते, मात्र त्यासाठी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार होती. आता कोरोना झाल्याने त्याला पाच दिवस विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची कोरोना चाचणी होईल. या चाचणीत जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याची फिटनेस चाचणी होऊ शकते. त्यानंतर तो जर या चाचणीमध्ये पास झाला तरच त्याला वेस्ट इंडीजच्या दौऱयावर जाता येणार आहे.























































