वगनाट्याची ‘परंपरा अन् योगदान’, सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे ठाम मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या वगनाटय़ाने एकेकाळी समाज प्रबोधनाची ज्योत प्रखरतेने पेटवून समाजाला दिशा दिली. काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले असले तरी या परंपरेची वगनाटय़ाची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक क्षेत्रात अधोरेखित करणारी ठरते, असे ठाम मत लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले.

साहित्य अकादमी तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी आणि शाहीर अमरशेख अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वगनाटय़ाची मौखिक परंपरा व योगदान’ या विषयावर कलिना येथे चर्चासत्र आयोजित केले होते. तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

चर्चासत्राला मुंबई विद्यापीठाचे पुलगुरू प्रा. रवींद्र पुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पद्मश्री प्रा. वामन पेंद्रे, डॉ. प्रकाश खांडगे, खंडुराज गायकवाड तसेच साहित्य अकादमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर यांची उपस्थिती होती. या चर्चासत्राचे नियोजन लोककला अकादमी प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

वगनाटय़ाची परंपरा जपावी

लोकपरंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सक्षमपणे पोहोचवण्यासाठी तमाशा कलावंतांनी वगनाटयाची परंपरा जपली पाहिजे, असे परिसंवादात बोलताना अभ्यासकांनी स्पष्ट केले.