
सामना प्रतिनिधी । बीड
बीड लोकसभेसाठी उद्या गुरूवारी मतदान होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दि.१८ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ३२५ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ३७ मतदान केंद्रे प्रशासनाने संवेदनशील म्हणून जाहीर केली असून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ३९ बीड लोकसभा मतदारसंघात गुरूवारी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सतर्कतेच्या दृष्टीने मतदार संघातील एकुण मतदार केंद्रापैकी २३३ मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डींग केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांनी दिली. बीड जिल्ह्यात एकुण २० लाख ४१ हजार १८१ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या ९ लाख ७९ हजार तर १० लाख ७९ हजार ३४४ पुरूष मतदारांचा समावेश असून जिल्ह्यात ४२३८ दिव्यांग मतदार आहेत तर ४ तृतीयपंथी मतदार आहेत.
बीड लोकसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील एकुण ३७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व संवेदनशील प्रकारात मोडत असून तेथील मतदान प्रक्रियेवर कोणत्याही बाबीचा अडथळा येवू नये यासाठी संपूर्णपणे काळजी घेतली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघातील १७ मतदान केंद्रांचा समावेश होत आहे या पाठोपाठ आष्टी, गेवराई, बीड, केज व माजलगाव या विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. याचबरोबर महिला मतदारांसाठी सखी मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून या मतदान केंद्रांमध्ये सर्व कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे पाहिले जाणार आहे. निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रावर पोहचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकुण ९५० वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये एसटी बस, टेम्पो, ट्रक, लक्झरी व मिनीबसचाही समावेश आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी १० हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेलेले आहेत. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तसेच शेजारील जिल्ह्यातील अधिकचा बंदोबस्तही मागविण्यात आला आहे.
३६ उमेदवार, ३ मशीन
बीड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ३६ उमेदवार असल्याने तीन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे .जिल्ह्यात २३८५ मतदान केंद्र असून त्यातील ३७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत, जिल्ह्यात ३६ उमेदवार असल्याने यंत्रणेवर मोठा ताण असून प्रत्येक केंद्रावर तीन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
































































