लोकसभेसह ‘या’ चार राज्यांच्या निवडणुका एकत्र शक्य !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
voting

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात झाल्या तर या निवडणुकांबरोबरच चार राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेता येतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाची ही माहिती महत्वपूर्ण मानली जात आहे कारण सद्यस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेणे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र, लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये घेतल्यास निवडणूक आयोग लोसभेसह चार राज्यांचा निवडणुका एकत्र घेऊ शकते, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि मिझोरामच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांसाठी आयोगाची तयारी झाली आहे काय असा सवाल रावत यांना केला असता या निवडणुकांसाठी आयोग सज्ज आहे. तसेच लोकसभा निवडणुका एप्रिल- मे ऐवजी डिंसेबरमध्ये घेतल्यास या चार राज्यांसह लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यास आयोग सक्षम असल्याचे ते म्हणाले. या राज्यांच्या निवडणुकासाठी आवश्यक असणाऱ्या ईव्हीएम मशीन सप्टेंबरपर्यंत आयोगाला मिळणार आहेत. तर व्हीव्हीपीएटी मशीन नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांसह लोकसभा निवडणुका घेण्यास अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १५ डिसेंबरला संपत आहे. तर छ्त्तीसगढचा ५ जानेवारी, मध्यप्रदेशचा ७ जानेवारी आणि राजस्थानचा २० जानेवारीपर्यंत कार्यकाळ आहे. या निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या १७.५ लाख व्हीव्हीपीएटी मशीनपैकी १६ लाख मशीन नोव्हेंबरपूर्वी मिळणार आहेत. तर उर्वरीत १.५ लाख मशीन नोव्हेंबरच्या अखेरीस मिळतील. त्यामुळे डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास तयारीसाठी आयोगाकडे पुरेसा वेळ असेल असे त्यांनी सांगितले.