
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
लोकसभेत कर्नाटकाच्या मुद्यावरून गदारोळ घालणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना आज पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. अध्यक्षांनी वारंवार सूचना करूनही विरोधी सदस्य वेलमधून हटत नव्हते तसेच लोकसभा सचिवालयाच्या कर्मचार्यांना अगदी खेटून उभे होते. त्यामुळे अध्यक्षांचा संतापही अनावर झाला. माझ्या स्टाफला हात लावाल तर खबरदार, अशा शब्दांत ओम बिर्ला यांनी खडसावल्यानंतर गोंधळी खासदारांसह सभागृहही अवाक् झाले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाटकाचे पडसाद सभागृहात उमटले. सेव्ह डेमोक्रसीचे फलक फडकवत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. तानाशाही नही चलेगी अशा घोषणा विरोधी पक्षाचे सदस्य देत होते. यावेळी काही नवोदित खासदार लोकसभा सचिवालयातील कर्मचार्यांना खेटूनच उभे असल्याचे लक्षात आल्यानंतर संयमी असलेल्या ओम बिर्ला यांनाही संताप अनावर झाला. तुमचे म्हणणे मांडण्याची संधी मी शून्य प्रहरात देतो.जागेवर बसा. आणि माझ्या स्टाफला हात लावाल तर खबरदार, अशा शब्दांत अध्यक्षांनी सुनावल्यानंतर गोंधळी खासदार जागेवर परतले.
मुख्यमत्र्यांनी कर्जमाफी केली म्हणताच प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांच्या चेहर्यावर उमटले कुत्सित हास्य
लोकसभेत आज एका वेगळय़ाच प्रसंगाची चर्चा रंगली. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकर्यांचा प्रश्न दिंडोरीच्या भाजपा खासदार डॉ. भारती पवार यांनी मांडला. महाराष्टातील शेतकर्यांना केंद्र सरकारने अपुर्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मदत द्यावी, अशी मागणी करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी केलेल्या कामाचे कौतुकही केले. महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकर्यांना कर्जमाफी देऊन मोठे काम केले, असे विधान खासदार पवार यांनी करताच त्यांच्या मागच्या बाकावर बसलेल्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मात्र कर्जमाफीचे हसू काही आवरता आले नाही. शेवटी खाली मान घालून दोघीही हसताना कॅमेर्यात कैद झाल्या.






















































