लोकसभेत जबरदस्त हंगामा, अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले; कामकाज ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वुई वॉण्ट जेपीसी, मोदी-अदानी भाई भाई, तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत आजही विरोधकांनी काळय़ा कपडय़ांमध्ये मोदी सरकारचा निषेध करत केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले.

लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी काळय़ा कपडय़ांसह फलक फडकवत वेलमध्ये धाव घेतली. विरोधी पक्षांचे खासदार घोषणाबाजी करत असतानाच कागदाच्या चिटोऱया करून काही खासदारांनी अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने भिरकावल्या. त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला संतापले. त्यांनी कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ व घोषणाबाजी सुरूच राहिल्याने तालिका सभापती रमादेवी यांनी सभागृहाचे काम दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यसभेतही गदारोळाची मालिका कायम राहिली.

मोदी सरकारच्या दडपशाही भूमिकेविरोधात विरोधकांनी आजही महात्मा गांधी पुतळय़ाजवळ एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आजही या आंदोलनाच्या अग्रभागी होत्या.