
इंग्लंडच्या भूमीत नगरच्या सायकलपटूने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला हिंदुस्थानचा झेंडा फडकवला आहे. लंडन ईडनबर्ग लंडन या 1,540 किमी सायकल स्पर्धेत नगरचे सायकलपटू शरद काळे पाटील यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी हिंदुस्थानचे नाव इंग्लंडच्या भूमीवर कोरले. इंग्लंड मधील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या लंडन एडीनबर्ग लंडन या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी नगर सायकलिस्टचे ज्येष्ठ सदस्य शरद काळे हे मागील आठवड्यात रवाना झाले होते. दर चार वर्षांनी लंडन एडीनबर्ग लंडन ही 1,540 किमीची अवघड स्पर्धा आयोजित केली जाते व त्यामध्ये जगभरातील कसलेले सायकल रायडर भाग घेत असतात. या स्पर्धेत शरद काळे नगर मधून जाणारे ते एकमेव स्पर्धक होय.
काळे यांनी डेक्कन क्लिफ हँगर ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा वेळेत पूर्ण केल्याबद्दल पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काळे पात्र झाले आहेत. इंग्लंड मध्ये होणारी ही सर्वात खडतर अशी ही सायकल स्पर्धा असून लंडन ते एडीनबर्ग व परत लंडन असे एकूण 1,540 किमी अंतर सायकलस्वारांना 128 तासात पार करायचे असते. 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा झाली. लंडन येथून सात ऑगस्टला वेगवेगळ्या गटामध्ये सायकलपटूंना सोडण्यात आले होते. डेबडेन येथुन सुरुवात झाल्यानंतर सेन्टेन्स एवेस, बोस्टन, लॉउथ, हासेल, माल्टन, बरणार्ड कॅसल, ब्राम्प्टन, मोफट, दूनफरलाइन, इंनरलेथिन, एस्कडलेमुइर, ब्राम्प्टन, बर्नार्ड कॅसल, माल्टन, हेसल, लॉउथ, बोस्टन, सेन्टेन्स इवेस व ग्रेट ईस्टन अशा विविध चेक पोस्टवर नोंद करून यात्रा पूर्ण करायची असते.
ही स्पर्धा अवघड असल्यामुळे अनेकांना ही सोडावी लागली किंबहुना वेळेत पूर्ण करता आली नाही. या स्पर्धेत जाण्यासाठी अनेक हिंदुस्थानींना विसा मिळणामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर मात करून अनेक स्पर्धक स्पर्धेसाठी पोहोचले परंतु खडतर प्रवास व नेवीगेशनची अडचण यामुळे अनेकांना ही स्पर्धा सोडावी लागली.
2021 साली कोरोना मुळे स्पर्धा होऊ शकली नाही. ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धेत यावर्षी भारतातून 120 सायकलिस्टनी भाग घेतला होता. बंगळुरू व चेन्नई येथून सर्वाधिक जास्त स्पर्धक आले होते. नगर मधून या स्पर्धेत भाग घेणारे व स्पर्धा पूर्ण करणारे काळे पाटील हे एकमेव सायकलिस्ट आहेत. या रेस दरम्यान सायकल स्वारांना उन, वारा, पाऊस, थंडी व सर्वात महत्वाचे म्हणजे नेविगेशनची मोठी अडचण असते. त्यावर मात करून स्पर्धा वेळेत पूर्ण करावयाची असते.
मागील चार वर्षापूर्वी काळे पाटील यांनी सायकलिंगचा श्री गणेशा केला व आज पर्यंत त्यांनी सात वेळा सुपर रांडोंनियर हा किताब पटकविला आहे. काळे पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रात तसेच मोटार सायकलिंग मध्ये अनेक विक्रम करून नगरचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे. काळे पाटील हे सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. काळे पाटील यांचा आत्मविश्वास पाहता ते ही स्पर्धा नक्की वेळेत पूर्ण करतील याची खात्री अनेकांनी अगोदरच व्यक्त केली होती. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानचे नाव इंग्लंडच्या भूमीवर कोरल्याबद्दल व देशाचा झेंडा फडकविल्याबद्दल नगरकरांनी काळे यांचं अभिनंदन केलं आहे.






























































