नो बॉलच्या निर्णयासाठी चौथा पंच नको!- ऍडम गिलख्रिस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमधील पंचांचे सदोष निर्णय कमी व्हावे यासाठी मैदानातील पंचांऐवजी तिसऱया पंचाने नो बॉलचा निर्णय द्यावा. त्यासाठी आणखी चौथ्या पंचांची नियुक्ती करण्याची गरज नाही, असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट यांने मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. तो चर्चगेटच्या कर्नाटक स्पोर्टस् मैदानावर टुरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आयोजित ‘क्रिकेट चॅरिटी चॅलेंज’ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होता.या कार्यक्रमात गिलख्रिस्ट याने मैदानात उतरून मुंबईच्या युवा क्रिकेटपटूंना खेळातील महत्त्वाच्या टीप्स दिल्या.

आयपीएल संचालक परिषदेने नो बॉलच्या निर्णयासाठी चौथ्या पंचांच्या नियुक्तीचे संकेत दिले आहेत. त्यावर बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, मैदानातील पंचांना एकाच वेळी समोर, बाजूला आणि त्यानंतर फलंदाजाकडे लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे नो बॉलचा निर्णय मैदानातील पंचांकडून चुकण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच नो बॉल ठरवण्याचा निर्णय तिसऱया पंचांकडे द्यावा. तो पंच टीव्हीवर रिप्ले पाहून 5 सेकंदांच्या आत आपला निर्णय देऊ शकता, मग त्या निर्णयासाठी चौथा पंच कशाला?