पाकिस्तानात लफडी होणार, तयार राहा! सरफराजचा संघ सहकाऱ्यांना इशारा

सामना ऑनलाईन। मॅन्चेस्टर

आयसीसी वर्ल्ड क्रिकेट कपमध्ये हिंदुस्थानकडून पराभूत झाल्याने पाकिस्तानी क्रिकेट टीमवर चहूबाजूकडून टीकेची झोड उठत आहे. यापार्श्नभूमीवर मायदेशात गेल्यावर संतप्त व नाराज चाहत्यांचा रागाचा सामना करण्यासाठी तयार राहा असा इशारा कॅप्टन सरफराज अहमद याने संघसहकाऱ्यांना दिला असून खेळात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिंदुस्थानकडून आयसीसी वर्ल्ड क्रिकेट कप सामन्यात 89 धावांनी पाकिस्तान पराभूत झाला. यामुळे पाकिस्तानमध्ये पाक खेळाडूंच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा बेजबाबदारपणा, त्यांचे फिटनेसकडे असलेले दुर्लक्ष यामुळेच हिंदुस्थान पाकिस्तानला हरवू शकला. अशी पाकिस्तानात चर्चा आहे. त्यातच शोएब मलिकचा हुक्का पार्टीतला व्हिडीओही व्हायरल झाल्याने या चर्चेत आणखीनच भर पडली आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला हे सहन करू न शकल्याने अनेक चाहत्यांनी टीव्ही फोडून , पाकिस्तानी खेळांडूना शिव्याशाप देऊन राग व्यक्त केल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. यामुळे सध्या लंडनमध्ये असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंचे धाबे दणाणले आहे. त्यातही पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज अहमद याच्यावरही काहीजणांनी पराभवाचे खापर फोडले आहे. हे सर्व पाहता चिंतेत पडलेल्या सरफराजने उरलेले चार सामने जिंकण्याचा सल्ला संघ सहकाऱ्यांना दिला आहे. त्याचबरोबर टीममधून माझी एकट्याची हकालपट्टी होणार नाही तर तुम्हांलाही घरी बसावे लागेल. कारण हे टीमवर्क आहे. असे सांगत त्याने संघखेळाडूंना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.