थकवा, अस्वस्थता, विस्मरण होतेय… काळजी घ्या, ही आहेत लाँग कोविडची लक्षणे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकवा, अस्वस्थता, विस्मरण, खाज, अंधुक दिसणे, नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसणे अशी लक्षणे जाणवत असतील तर काळजी घ्या… कारण ही आहेत लाँग कोविडची लक्षणे. लंडन विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही रुग्णांना जवळपास 200 लक्षणे जाणवत असल्याचे या संशोधनात दिसून आले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने कोरोना होऊन गेल्यानंतर जाणवणाऱ्या लक्षणांवर संशोधन केले. विद्यापीठाच्या न्यूरोसायंटिस्ट अ‍ॅथेना अक्रमी यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, जगभरातील 56 देशांतील 3762 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना होऊन गेल्यानंतरही दिसणाऱ्या 203 पैकी 66 लक्षणांवर सात महिने लक्ष वेंâद्रित करण्यात आले. ज्यांचा अभ्यास करण्यात आला ते सर्व रुग्ण 18 वर्षे वयावरील होते आणि त्यांना 257 प्रश्न विचारण्यात आले. यात कोरोना होऊन गेल्यानंतरही रुग्णांना तब्बल 200 वेगवेगळी लक्षणे जाणवत असल्याचे दिसून आले.

लाँग कोविड काय आहे?

वैद्यकीय क्षेत्रात लाँग कोविडची परिभाषा अद्याप करण्यात आलेली नाही. एखाद्या रुग्णाला कोरोना होऊन गेल्यानंतरही काही लक्षणे जाणवतात. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर शरीरातून विषाणू गेला असे समजले जाते. मात्र काही महिन्यांनंतर पुन्हा लक्षणे जाणवतात. त्यालाच लाँग कोविड म्हणतात.

लाँग कोविडची लक्षणे

थकवा, अस्वस्थता, विचार करण्याची शक्ती कमी होणे ही सामान्य लक्षणे दिसतातच. त्याशिवाय वंâपन, खाज, महिलांच्या मासिक पाळीचे वेळापत्रक बदलणे, लैंगिक निरुत्साह, हृदयाचे ठोके वाढणे, लघवीवर नियंत्रण न राहणे, विस्मरण, अंधुक दिसणे, डायरिया, कानात आवाज घुमणे, चट्टे आदी 200 प्रकारची लक्षणे आढळतात.

इतर तपासण्याही करायला हव्यात

कोरोनाला मात दिल्यानंतर डॉक्टर हृदय तसेच श्वसनमार्गाशी संबंधित तपासण्या करायला सांगतात. मात्र लाँग कोविडमध्ये याशिवाय इतर चाचण्याही करायला हव्यात. यात प्रामुख्याने न्यूरोसायकियाट्रिक, न्यूरोलॉजिकल चाचण्यांचा समावेश आहे. या लक्षणांमुळे शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवर परिणाम होण्याची भीती असते. या कारणांचा शोध लावूनच रुग्णावर उपचार करणे शक्य आहे. ही लक्षणे किती काळ जाणवतील हे सांगत येत नाही.