अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । लोणी

अनैतिक संबंधात पत्नी अडसर ठरत असल्याने एका जिल्हा परिषद शिक्षकाने तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना लोणी खुर्द येथे घडली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीस लोणी पोलिसांनी अटक केली असून त्यास 24 तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विश्वास रंगनाथ गायकवाड असे त्याचे नाव आहे. तर कल्पना असे मृत महिलेचे नाव आहे. कल्पनाचे वडील दामू नामदेव भालेराव यांच्या फिर्यादीवरून आरोपीस व त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी १९ तारखेस घडली आहे.

शिक्षक असलेला विश्वास दाढ बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोकरीस आहे. २० वर्षांपूर्वी त्याचा विवाह कल्पना हिच्याबरोबर झाला होता. पण विश्वास याचे मामे बहिणीबरोबर अनैतिक संबंध होते. यास कल्पनाचा विरोध होता. यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. या बाबत कल्पनाच्या वडिलांनी विश्वासला वारंवार समजून सांगितले होते. पण विश्वास प्रेमसंबंध तोडण्यास तयार नव्हता. उलट तो कल्पनाला जास्तच त्रास देऊ लागला होता. त्यातूनच त्याने व त्याच्या प्रेयसीने कल्पनाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 19 तारखेला त्यांनी कल्पनाची गळा आवळून हत्या केली.

या घटने नंतर लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि प्रवीण पाटील व लोणी पोलिसांनी आरोपीस ताबडतोब अटक करून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता 24 तारखे पर्यंत त्यास पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तसेच आरोपी शिक्षकाची चुलत मामाची मुलगी अर्थात प्रेयसी हिस काल उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत लोणी पोलिसात 302 (34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.