विमानात प्रवासी झाले विसरभोळे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सीआयएसएफचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर

लोकलमध्ये घाईगडबडीत प्रवासी साहित्य विसरतात हे सर्वांना माहीत आहे, पण विमान प्रवासातही प्रवासी विसरभोळे होत चालले आहेत. गेल्या 18 महिन्यांत तब्बल 27 हजार 917 हरवलेल्या वस्तू पुन्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ने प्रवाशांना परत केल्या आहेत. त्या वस्तूंची किंमत सुमारे 15 कोटी रुपयांहून अधिक आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशाअंतर्गत आणि परदेशातून रोज हजारो विमाने ये-जा करत असतात. या विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे आहे. विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेऱयाचे जाळे पसरले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जाते. विमानतळावर प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू आढळून आल्यावर त्या हरवलेल्या वस्तू कक्षात जमा केल्या जातात. त्या वस्तूचे वर्णन नमूद केले जाते. विमानतळावर चेकिंग झाल्यावर खरेदी किंवा अन्य कारणात्सव प्रवासी हे त्याच्या महागडय़ा वस्तू जागेवर ठेवून निघून जातात. प्रवासादरम्यान त्यांना वस्तूची आठवण झाल्यावर ते विमानतळावरील सीआयएसएफशी संपर्क साधतात.

जानेवारी 2021 ते जून 2022 या काळात तब्बल 27 917 वस्तू हरवलेल्या वस्तू या प्रवाशांना परत करण्यात आल्याची नोंद आहे. 2021 चा विचार केला तर जानेवारी महिन्यात 1825, फेब्रुवारीमध्ये 2601, ऑक्टोबरमध्ये 2462, आणि डिसेंबरमध्ये 2002 प्रवाशांच्या वस्तू हरवल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या मे महिन्यात अवघ्या 345 वस्तू हरवल्याची नोंद आहे, तर मार्च 2022 मध्ये 2124, एप्रिल 2593, मे 2683, जून 2192 हरवलेल्या वस्तूंची नोंद आहे.

या वस्तू होतात गहाळ

महागडे मोबाईल, लॅपटॉप, मोबाईचे पॉड, महागडे पेन, लॅपटॉपचा चार्जर आदी वस्तू प्रवासी विसरत असल्याची नोंद आहे. ज्या प्रवाशाचे साहित्य विमानतळावर विसरले आहे, पण ते सध्या परदेशात आहेत अशा प्रवाशांच्या वस्तू त्याच्या वारसदारांना दिल्या जातात. कित्येकदा प्रवासी हे नजर चुकीने वस्तू घेऊन जातात, तेव्हा सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या प्रवाशाची माहिती काढली जाते. संबंधित विमानतळाला माहिती देऊन त्या वस्तू ताब्यात घेतल्या जातात.

हरवलेल्या वस्तू प्रवाशांना परत केल्या जातात. वस्तू परत करणे ही आमची डय़ुटी आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जाते. शंभर टक्के आम्ही प्रवाशाच्या वस्तू त्यांना सुपूर्द केल्या आहेत.
– श्रीकांत किशोर, उपमहानिरीक्षक, सीआयएसएफ, मुंबई विमानतळ

जानेवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते डिसेंबर काळात वस्तू हरवण्याच्या केसेस अधिक
महागडे मोबाईल आणि पेनसारखे मॉडलचे असल्याने ते नजर चुकीने नेण्याचे प्रकार अधिक आहेत.